धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात धाराशिव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातील विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसह नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल 62 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. परंडा, कळंब, तुळजापूरसह सर्वच तालुक्यांतील दळणवळण सुसाट होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातून.जाणाऱ्या राज्य महामार्गांचा कायापालट करण्यासाठी 28 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा राज्यमार्गांच्या सुधारणेसाठी 28 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने परंडा आणि कळंब तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. तर परंडा तालुक्यातील महारटाकळी-पाटोदा-भूम-वारदवाडी या राज्यमार्ग क्र. 62 वरील मोठ्या पुलाचे बांधकाम आणि रस्ता सुधारणेसाठीही मोठा निधी मिळाला आहे.
कळंब तालुक्यात राज्यमार्ग-52 ते कळंब-लातूर या राज्यमार्ग क्र. 236 च्या सुमारे 14 किलो मीटर अंतराच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर धाराशिव तालुक्यात राज्य मार्ग-211 ते उपळा-तेर-जागजी या राज्यमार्ग क्र. 239 च्या सुधारणेचे कामही मार्गी लागणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील राज्य मार्गांसोबतच जिल्हा मार्गांसाठीही 34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून विविध जिल्हा मार्गावर पुलांचे जाळे विणले जाणार आहे. प्रमुख जिल्हा मार्गांच्या एकूण 9 कामांसाठी 34 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या निधीतून अनेक ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. तेर-डकवाडी-काजळा या मार्गावरील काजळा गावाजवळ आणि कोळेवाडीजवळ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तुळजापूर-धाराशिवसह तावरजखेडा, बेंबळी, आरणी आणि अणदूर परिसरातील तब्बल 86 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग मिळणार आहे. भूम तालुक्यात गिरवली-ईट-पाथु्रड-वालवड रस्ता क्र. 9 वरील वालवड येथे नवीन लहान पूल उभारला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
