भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईट येथे भेट देणार असून, भाजपच्या अधिकृत उमेदवार वर्षा ज्ञानेश्वर गीते यांच्या प्रचारार्थ ते उपस्थित राहणार आहेत.
या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने ईट परिसरात भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली असून, या सभेला तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे सर्व नेते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांनी केले आहे. ही सभा सकाळी ठीक साडेअकरा वाजता होणार आहे.
ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील विकासकामे, शेतकरी हिताचे निर्णय, महिला सक्षमीकरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. वर्षा ज्ञानेश्वर गीते या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या उमेदवार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या प्रचारसभेद्वारे भाजपचा संघटनात्मक बळकटीकरणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांनी सर्व भाजपप्रेमी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
