भुम (प्रतिनिधी)-  शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा  संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते श्री. प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त आरसोली रोडवरील श्री. प्रभू विश्वकर्मा मंदिर येथे भावपूर्ण वातावरणात महाआरती संपन्न झाली. यावेळी विश्वकर्मा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू विश्वकर्मा यांना अभिषेक, पूजन व आरती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांनी मंदिरात दर्शन घेऊन प्रभू विश्वकर्मा यांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थित समाजबांधवांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी समाजाच्या वतीने नगराध्यक्षा ताईंचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे म्हणाल्या की, “प्रभू विश्वकर्मा हे सृजनशीलतेचे, कौशल्याचे आणि कष्टाचे प्रतीक आहेत. सुतार समाजाने आपल्या मेहनतीच्या बळावर समाजाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. समाजाची परंपरा, संस्कृती जपण्याचे कार्य असेच पुढे सुरू राहावे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास सुतार समाजातील ज्येष्ठ बांधव, युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुतार समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top