धाराशिव (प्रतिनिधी)- स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. अव्वाचे सव्वा बिल आले असून त्यात दुरुस्ती करण्यात यावी, तसेच एकदम इतकं बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळं त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, सद्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणी मूळ वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मीटर चांगले असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत. बिलाची रक्कम नोव्हेंबर रोजी 700 रुपये तर डिसेंबर मध्ये 800 रुपये होती. तेच बिल जानेवारीमध्ये पंधरा हजारच्या घरात आले आहे. या बिलामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. तसेच हफ्ते पाडून देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली मान्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कैलास पाटील यांची मागणी मान्य केली आहे. असे हफ्ते पाडून देण्यात अडचण नाही पण बिल मात्र भरावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले. वीज बिलाचे दर कमी केले असून स्मार्ट मीटर बसवले त्यांना दहा टक्के बिलामध्ये सवलत देण्यात आली आहे अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
