धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनतेने दिलेला निर्णय आपण खुल्या मनाने स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
जय-पराजय या गोष्टींपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने लढत देत चांगली कामगिरी केली. याचा नेहमीच अभिमान राहील असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून सत्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी पुढील काळातही लढा सुरूच राहील. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मतदार बांधव-भगिनी तसेच गेल्या महिनाभर निवडणूक प्रचारात मोलाची साथ देणारे महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
