भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना आजच्या युवकांनी शिवरायांसारखे स्वप्न पाहून स्वतःचे स्वराज्य उभे करावे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. शिवरायांनी आपल्या स्वराज्यात मावळ्यां बरोबरच शेतकऱ्यांचाही सन्मान केला. असे प्रतिपादन राहुल गाढवे यांनी केले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील युवा उद्योजक बालाजी गिलबिले यांनी आपल्या निवासस्थानाच्या तिसऱ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा उभी करून शिवजयंतीनिमित्त तिचे लोकार्पण मोठ्या उत्साहात केले. माजी सैनिक व मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या प्रसंगी गाढवे बोलत होते.
गिलबिले यांचे वडील सैन्यातून निवृत्त झाल्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या जवानांचे प्रतीक उभारण्यात आले आहे. तर पहिल्या मजल्यावर “जय जवान, जय किसान” हा संदेश देत कष्टकरी शेतकऱ्याची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या त्रिसूत्री संकल्पनेतून देशसेवा, शेतकरी सन्मान आणि शिवरायांचे राष्ट्रधर्म यांचा संगम साधण्यात आला आहे. शिवजयंती दिनी या उपक्रमाद्वारे गिलबिले यांनी नागरिकांना राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्याच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेचे शहरभर कौतुक होत आहे.
