धाराशिव (प्रतिनिधी)-  कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 438 कोटी 69 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्प म्हणजे तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे. हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

महायुती सरकारने तुळजापूरच्या विकासासाठी एकूण 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार या निविदेतील कामात प्रामुख्याने भाविकांच्या मूलभूत गरजा आणि आधुनिक सोयीसुविधांवर भर देण्यात आला आहे. हुडको एसटी स्टँड, आराधवाडी आणि घाटशीळ परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक भाविक सुविधा केंद्र, भव्य भक्त निवास, व्यावसायिक संकुल, मल्टीपर्पज हॉल आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्थेचा समावेश असणार आहे. ही सर्व कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, भूसंपादनासाठी अधिक दर देण्यात येणार आहे. 


पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

येणाऱ्या काळात तुळजापूरच्या वैभवात भर टाकणारे काही विशेष प्रकल्प साकारले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना देवी आशीर्वाद देत असतानाचे भव्य 108 फूट उंचीचे शिवभवानी शिल्प, रामदरा तलाव परिसरात भव्य उद्यान, साऊंड अँड लाईट शो आणि वॉटरफ्रंटची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मार्च 2028 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासकीय स्तरावरही या कामाला आता मोठी गती मिळाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top