धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता चांगले यश मिळत आहे. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल 14 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 10 कोटी 87 लाख रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नळदुर्ग किल्ला हा मूळचा कल्याणीच्या चालुक्य काळात बांधलेला मातीचा गढीवजा किल्ला होता. पुढे बहामणी काळात (इ.स. 1351 ते 1480) त्याचे रूपांतर भक्कम दगडी बांधकामात झाले. आदिलशाही राजवटीत या किल्ल्याला शहादुर्ग असे नाव देण्यात आले होते. याच काळात, 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून प्रसिद्ध पाणी महल साकारण्यात आला, जो आजही अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जगभर ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून नळदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ व्हावी आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावे, यासाठी नळदुर्ग किल्ल्याचा चौदा कोटी रुपयांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
स्थानिक युवकांना हक्काचा रोजगार
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील किल्ल्याचे रूप पालटणार आहे. अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटकही किल्ल्याला भेट देण्यासाठी येतील. पर्यायाने स्थानिक युवकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
