धाराशिव (प्रतिनिधी)- नुकत्याच पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित केलेल्या खास महिलांच्या गझल मुशाऱ्यात धाराशिवच्या कवयित्री, गझलकारा स्नेहलता झरकर -अंदुरे यांना “गझल ध्यास“ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गझल मंथन सा . संस्था कोरपना, जि. चंद्रपूर आयोजित सलग 3 ऱ्या अ. भा.महिला गझल संमेलनात कै जबनाबेन सोमजी पाटील स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा शरद सोमजी पाटील व हेमलता शरद पाटील यांच्या सोहम कोलाइड्स, शहादा प्रायोजिक “गझलध्यास - 2026 “ या रोख रक्कम आणि सुंदर सन्मान चिन्ह असणाऱ्या पुरस्काराच्या मानकरी  धाराशिवच्या गझलकारा स्नेहलता झरकर- अंदुरे  होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

 यानिमित्त आयोजित केलेल्या गझल मुशायऱ्यातील 5 व्या मुशायऱ्याचा अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संमेलनाध्यक्षा सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी, स्वागताध्यक्षा  वैशाली माळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

याचवेळी गझल मंथन सा. संस्थेकडून  ममता सिंधुताई सपकाळ यांना “ गझलक्रांती “ पुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनातील सुंदर  मुशायरे गझल रसिकांचे कान आणि मन तृप्त करणारे ठरले.“ समकालीन गझलेत महिला गझलकारांचे मूल्यवर्धक योगदान“ हे चर्चासत्र महिला गझलकारांसाठी मार्गदर्शक ठरले. या संमेलनास महिला गझलकारांची मोठी उपस्थिती होती .या देखण्या संमेलनाचे उत्कृष्ट, नेटके नियोजन ग .मं. सा . संस्थेच्या पुणे विभाग आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीने केले होते. स्नेहलता झरकर-अंदुरे यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. शहरातील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने नुकताच त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला.

 
Top