धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील अग्रमानांकित अशा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय घटना घडली आहे. महाविद्यालयाची रासेयो विभागाची स्वयंसेविका सावळे गौरी विजय बी.ए. प्रथम वर्ष हिची दि. 3 फेब्रुवारी 2026 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरासाठी निवड झाली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातून झालेली ही निवड तरुणाईच्या सामाजिक जाणीवेला आणि राष्ट्रभक्तीच्या मूल्यांना अधोरेखित करणारी आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजाशी नाते जोडतात. राष्ट्राची विविधता समजून घेतात आणि एकात्मतेचे मूल्य आत्मसात करतात. गौरी साळवे हिची निवड ही तिच्या कार्यतत्परतेची, नेतृत्वगुणांची आणि सामाजिक बांधिलकीची पावती मानली जात आहे. विविध राज्यांतील स्वयंसेवकांसोबत संवाद साधत देशाच्या सांस्कृतिक वैविध्यातून ‌‘एक भारत, श्रेष्ठ भारत‌’ या संकल्पनेचा अनुभव घेण्याची संधी तिला या शिबिरातून मिळणार आहे.  या यशाबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, सह. मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता साखरे, डॉ. स्वाती जाधव आणि डॉ. अवधूत नवले यांनी  गौरी सावळे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून  पुढील राष्ट्रीय शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. 

 
Top