कळंब (प्रतिनिधी)- “एकमेव रयतेचा नायक... ना कोणत्या जातीचा, ना कोणत्या धर्माचा; 125 कोटी भारतीयांचा अभिमान!” अशा जयघोषात कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, बहुजन प्रतिपालक, महाराजाधिराज, योगिराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अशा विविध बिरुदावल्यांनी शिवरायांचा गौरव करत संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरभर रक्तदान व अन्नदान उपक्रम
शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळे व संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. तसेच गरजूंसाठी अन्नदान उपक्रम राबवून शिवरायांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून सलाम करण्यात आला.
भगव्या पताकांनी दुमदुमले शहर
कळंब शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि इमारती भगव्या पताकांनी सजल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि शिवगर्जनांनी वातावरण भारावून गेले होते. शेकडो शिवभक्तांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात मिरवणुका काढत उत्साह ओसंडून वाहिला.
शिवविचारांना मानाचा मुजरा
शिवजयंती केवळ उत्सव नसून ती विचारांची प्रेरणा आहे, असा संदेश विविध मान्यवरांनी दिला. शिवरायांचे स्वराज्य, न्यायनिष्ठा, स्त्री-सन्मान, सर्वधर्म समभाव आणि प्रजाहितदक्षता या तत्वांची आजच्या पिढीने आचरणात आणणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण शहरात भक्ती, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. कळंबकरांनी एकमुखाने शिवरायांच्या विचारांना मानाचा मुजरा करत जयंती उत्साहात साजरी केली.
कळंब शहरात सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती, कळंब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 रोजी शहरात भव्य ‘महारक्तदान शिबिर’ आयोजित करण्यातआले होते यात 300 शिवभक्तांनी रक्तदान करून एक ऐतिहासिक नोंद केली .त्याचप्रमाणे कळंब बस आगारात वाहक चालक व कर्मचाऱ्या सह 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली.
