भुम (प्रतिनिधी)-  भूम शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध भागांत उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात सार्वजनिक शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. 

जयंतीनिमित्त सकाळी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच फुलांची उधळण करत घोषणाबाजीच्या वातावरणात शिवभक्तांनी उत्सव साजरा केला. नगर परिषदेसमोर महाराजांना वंदन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. श्री नागोबा मंदिर, भूम येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागोबा तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रमाई नगर, भूम पोलीस स्टेशनसमोर, जिजाऊ नगर तसेच शिवाजीनगर परिसरातही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोष्टी गल्ली येथे महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आतिषबाजी करत जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच तहसील कार्यालय ,नगरपरिषद ,पंचायत समिती ,पोलीस स्टेशन व सर्व कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. भूम शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ठीक 5 वाजता ढोल पथक, लेझीम पथक व मर्दानी खेळांच्या सहभागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत निघालेल्या या मिरवणुकीत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. संपूर्ण शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.


 
Top