धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम येत्या 10 ते 15 दिवसात अधिसुचना निघाल्यानंतर जाहीर होणार आहे. अध्यक्षपदी आपल्याच पक्षाचा सदस्य बसवा यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना-काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपापले निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर नेले आहेत.
याबाबत सुत्राने दिलेल्या माहिती नुसार भाजप नेते यांच्या बंगल्यावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य एकत्र बैठकीसाठी बोलवण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चा होवून सर्व सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर पाठविण्यात आले आहेत. भाजप व राष्ट्रवादीने सावध पावित्रा घेतलेला दिसताच शिंदे शिवसेना यांनी आपले निवडून आलेले जि. प. सदस्य एकत्र केले. परंतु 15 सदस्यापैकी काही सदस्य दुसऱ्या गटात गेल्याचे समजताच पालकमंत्री यांनी सदर नेत्यास फोन करून सदस्य परत पाठविण्याचे सांगितल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटाचे 7 व काँग्रेसचे 3 या प्रमाणे दहा जि. प. सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भाजप व शिंदे सेनेमध्ये मतभेद
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला 40 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असले तरी धाराशिव जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी आपल्या पक्षाचा उमेदवार असावा यासाठी भाजप व शिंदे शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपच्यावतीने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा माजी जि. प. उपाध्यक्ष अर्चना पाटील या जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. तर शिंदे शिवसेनेच्यावतीने माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड या जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बिराजदार यांच्या पत्नी सविता बिराजदार यापण जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे लक्ष लागले आहे.