मुरूम (प्रतिनिधी)- राज्यांतील गुणी, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान शिर्डी येथे रविवार (ता. 1) रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव व्हावा, या उद्देशाने बी दि चेंज फाउंडेशनतर्फे दरवर्षी या राज्य स्तरावरील पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी कर्नल सुनील राजदेव, माजी सैनिक अधिकारी अरुण भंडारे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार, क्विरिप्लायचे सीईओ ऋषिकेश खैरनार, एम्स अकॅडमीचे संचालक सुधाकर शृंगारे, अमृत रोहोम, संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, विश्वस्त अभिषेक तुपे आदींच्या हस्ते डॉ. सुधीर पंचगल्ले यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदानातून आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्य आदर्श शिक्षक 2026 या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉ. सतीश शेळके, माजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.


 
Top