धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील ईट, येनेगुर, आपसिंगा व ढोकी येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, संघटन मंत्री संजय कौडगे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या समवेत उपस्थित होतो.
या जाहीर सभांमध्ये बावनकुळे यांनी राज्यातील महायुती सरकारने आमलात आणलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत उपस्थितांना संबोधित केले. विशेषतः मुख्यमंत्री सौर वहिनी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प, तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना ही सरकारची सामाजिक बांधिलकी दर्शवणारी योजना असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. यासोबतच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, महिला, युवक, लघुउद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी या देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांच्या समवेत केलेल्या प्रवासादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराची सद्यस्थिती, संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्यांचा उत्साह याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक गट व गणामध्ये महायुतीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता मोठ्या बहुमताने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असल्याची ठाम ग्वाही यावेळी त्यांना दिली.
महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखवलेला विश्वास हा आगामी निवडणुकीत निर्णायक विजयात परिवर्तित होईल, यात कोणतीही शंका नाही. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, अनिल काळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी आदी उपस्थित होते.
