वाशी (प्रतिनिधी)- सोशल मीडियाच्या आहारी जाऊन व्यक्ती आळशी आणि व्यसनाधीन होत आहे परंतु ग्रंथाच्या वाचनामुळे अनेक पिढ्या घडल्याची उदाहरणे असून आजच्या डिजिटल युगामध्ये चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक यांनी वाशी येथील ग्रंथोत्सव प्रसंगी प्रतिपादन केले.

वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये धाराशिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व वाशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन (14 व 15 फेब्रुवारी )दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील हुसे होते. याप्रसंगी मंचावर  ग्रंथालय संचालनालय,मुंबईचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, यांनी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले, नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड व अजिंक्य विद्या मंदिर शाळेचे संस्थापक एस. एल. पवार,सुहास सरवदे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात  महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलाने करण्यात आली. याप्रसंगी गजानन कोटेवार, सुनील हुसे, अशोक गाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज सकाळी विठ्ठल- रुक्मिणी मंदिरापासून “पुस्तक ग्रंथ दिंडी“ची मिरवणूक ह.भ. प. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या संयोजनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले.

 
Top