मुरुम (प्रतिनिधी)- देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे होत असताना आपल्या एकाही लोकशाही सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही. उलट शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारणी सदस्य प्रा. किरण सगर यांनी केले. महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी (ता.19) रोजी श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन कट्टाचे उद्घाटन प्रा. किरण सगर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पतसंस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संस्थेचे सचिव कमलाकर जाधव,संचालक अमृत वरनाळे, विजय काशेट्टी, अशोक जाधव, श्रीशैल बिराजदार, शिवराज समन, बाबासाहेब पाटील, वंदना सोनवणे, इंद्रजित लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सगर म्हणाले की, महाराजांचे लोककल्याणकारी राज्य हे रयतेचे राज्य होते. त्यांना स्वतःपेक्षा आपल्या प्रजेची जास्त काळजी वाटत होती.वतनदार महसूल ग्रामाधिकारी यांच्या भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात त्यांनी कठोर पावले उचलली होती. त्यांनी वसुलीची मनमानी पद्धत बंद करुन योग्य नियमावली तयार करुन सारा वसूली केली. शेतकऱ्यांना बी बियाणे, मशागत याकरिता व्यवस्था केली.जमीन मोजणी करुन कर ठरवून दिला. त्यांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश दिले, ‘ शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही हात लावू नका, पाणवठ्यातून गरजेपेक्षा जास्त पाणी घेवू नका, फुकट काही घेवू नका ’ आज सरकार विकासाच्या नावाखाली गरीब शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या जमिनी मूठभर उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट घालत आहे. आज देशात महिला सुरक्षित नाहीत. शिवाजी महाराज महिलांचा खूप आदर करत. त्यांच्या राज्यात महिला पूर्णपणे सुरक्षित होत्या. या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की, कोणत्याही अन्यायी, अत्याचारी आणि जुलमी सत्तेपुढे गुडघे टेकणार नाही, आपल्या धार्मिक उन्मादात देशाच्या सद्भावनेचा बळी देणार नाही, सर्व जाती, धर्माचे आणि पंथाचे लोक एकत्र गुण्या-गोविंदाने राहू, एकमेकांच्या भावनांचा आदर करू आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ असे मत मांडले.
मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले, वाचन संस्कृती जोपासून वाचनाप्रती विद्यार्थ्यांना मनात गोडी निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने वाचनालयामार्फत वाचन कट्टा स्थापन करण्यात आला आहे. यामुळे चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होणार असल्याचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. दत्तात्रय इंगळे यांनी पतसंस्थेच्या वाढता आलेख यावेळी मांडला. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, सचिन कंटेकुरे, नेहा शेवाळकर, राजेंद्र मुदकण्णा, संतोष मुदकण्णा, महांतय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना संस्थेचा लेखाजोखा मांडून संस्थेच्या सर्व विषय पत्रिकेचे वाचन केले. सूत्रसंचालन किरण गायकवाड तर मनीष मुदकण्णा यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्येने नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.
