उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 च्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जिल्हा कोर्टातील ज्येष्ठ विधीज्ञ तथा उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे धनराज तेलंग विद्यानंद सुत्रावे उपस्थित होते.
पुढे बोलताना अँड आळंगे म्हणाले की मुलाचे वय 21 वर्ष तर मुलीचे वय 18 वर्षे असेल तरच लग्न कायद्याने मान्य होते. अन्यथा कमी वयात लग्न करणे म्हणजे बालविवाह करणे असा अर्थ होतो. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे आले पाहिजे. मुलांनी आपल्या घरात शेजारी गल्लीमध्ये किंवा परिसरात बालविवाह होत असतील तर सामाजिक संघटना शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना येऊन सांगितले पाहिजे या कायद्याबद्दल सर्व स्तरावर जनजागृती होणे काळाची गरज आहे.
लहान वयात लग्न करून अनेक समस्यांना तोंड देण्यापेक्षा मुलीला सज्ञान होऊन लग्न केले तर दोन्ही घराचा उद्धार होईल. बालविवाह होत असतील तर समाजातील व्यक्तींनी अशा बालविवाहाला उपस्थित राहू नये अशा बालविवाहाला उपस्थित राहणे म्हणजे बालविवाहाला समर्थन देणे असा अर्थ होतो आणि आपणही कायद्याने दोषी ठरतो त्यामुळे समाजातील सर्व व्यक्तींनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बद्दल जनजागृती करणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार सोनाली मुसळे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक बशीर शेख, सदानंद कुंभार, नागेश स्वामी, प्रवीण शिंदे, संजय रूपाजी, वर्षाराणी पाटील, धनराज गाडेकर, नागसेन बनसोडे, राजू सरपे, डी सी कांबळे, के एस चिकले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
