भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व तालुक्यात यंदाची शिवजयंती साधेपणाने, डीजेमुक्त आणि लेझर लाईटविना साजरी करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. प्लाझमा, बीम लाईट व लेझर लाईटचा वापर टाळावा, तसेच ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरणारे डीजे न लावता आदर्श पद्धतीने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमुले व पोलिस निरीक्षक श्रीगणेशा कानगुडे यांनी केले.
सोमवारी भूम पोलिस ठाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. भूम शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे करण्याची परंपरा असून ती कायम राखावी, असेही यावेळी सांगण्यात आले. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह घोषणा, धोकादायक स्टंट, तलवारी-हत्यारे यांचे प्रात्यक्षिक किंवा परवानगीशिवाय फटाक्यांची आतषबाजी करू नये. सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंसेवकांची नियुक्ती, ढोल पथक, लेझीम पथक, असे मर्दानी खेळ मिरवणुकीत दाखवावे तसेच मिरवणुकीचा ठरलेला मार्ग व वेळ पाळावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दि. 18 बुधवार रोजी सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीगणेशा कानगुडे यांनी केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद, प्रल्हाद सरोदे, गोपनीय शाखेचे अमलदार कर्णराज राव, अजित कवडे तसेच मंडळांचे पदाधिकारी व एमएसईबीचे कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी होणार असली तरी कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. शांतता, सामाजिक सलोखा आणि ऐतिहासिक परंपरेचा सन्मान राखत आदर्श शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
