कळंब (प्रतिनिधी)- समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे महान समाजसुधारक संत गुरु रविदास महाराज यांची जयंती दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी कळंब शहरातील १०१ नगर, विद्यानगरी परिसरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गुरु रविदास महाराज मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे विधिवत पूजन करून झाली. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन कळंब–धाराशिव विधानसभेचे आमदार कैलास  पाटील यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी  रंगनाथ कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे, शिवसेना उपनेत्या  माजी आमदार संगीताताई ठोंबरे, शंकर पाखरे, सुरेखाताई घोडके, मुस्ताकभाई कुरेशी, इम्रान मुल्ला, मुसद्दिक काझी, सफुरा काझी, सुधीर भवर, अरुण राऊत, गणपतराव चौधरी , मुबिन मणियार, महमद चाऊस तसेच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशा राऊत, तालुकाध्यक्ष अशोक लाड, युवकाध्यक्ष सतीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय उपाध्यक्ष जालिंदर लोहकरे यांनी केले. संत रविदास महाराजांचे समतेचे तत्त्वज्ञान, कर्मप्रधान जीवनशैली आणि संघटनात्मक विचार आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उद्घाटनप्रसंगी आमदार कैलास  पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली असून मराठवाडा युवकाध्यक्ष विकास कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सहकार्याने भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. भविष्यात मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आणि सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी चर्मकार समाजाच्या विकासासाठी नगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगितले. तर संगीताताई ठोंबरे यांनी संत रविदास महाराजांचे विचार आत्मसात करून समाजाने प्रगतीचा मार्ग स्वीकारल्याबद्दल गौरव व्यक्त केला.

जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी, यासाठी मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राचार्य काकासाहेब मुंढे आणि बाबासाहेब कांबळे यांनी केले. शेवटी मराठवाडा युवकाध्यक्ष विकास कदम यांनी उपस्थित मान्यवर, समाजबांधव, महिला भगिनी, युवक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती समिती आणि समाजातील सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

 
Top