धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) निकाल जाहीर केला. त्यात चार लाख 46 हजार 730 पैकी अवघे 11.28 टक्केच (50 हजार 369) भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 4 लाख सध्याचे शिक्षक आणि भावी शिक्षक नापास झाले आहेत.
राजकीय चर्चांमध्ये या महत्त्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले आहे. या परीक्षेला सध्या नोकरीत असलेले अनेक शिक्षक आणि ज्यांना शिक्षक व्हायचे आहे, असेही शिक्षक परीक्षेला बसले होते. यातून सध्याच्या व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिकून डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे. दर्जाहीन शिक्षणातून दर्जाहीन विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यातून पुन्हा उद्याचे दर्जा खालावलेले शिक्षक आणि त्यांच्या हातून दिले जाणारे पुन्हा तसे शिक्षण हे दृष्टचक्र या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
मान्य आहे की नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेची सक्ती करावी का ? यावर वाद होऊ शकतो. ती सक्ती कोणत्या तारखेपासून करावी ? यावरही वाद होऊ शकतो. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असावा का ? यावरही नक्कीच चर्चा होऊ शकते. किंबहुना राज्यातील शिक्षकच काय सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ज्ञान अद्ययावत होणारी परीक्षा असली पाहिजे व त्या परीक्षेच्या आधारे चे वेतनवाढ दिली पाहिजे. यामुळे शिक्षकांसह घटक वाचन करतील,अभ्यास करतील पण तो विषय वेगळा आहे. नोकरीतील सुरक्षितता ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला काहीच केले नाही तरी चालेल असा संदेश देते आणि कधीतरी शिकलेल्या पुस्तकांच्या आधारे लहान मुलांना शिकवायला काय लागते ? अशी मानसिकता करून अनेक जण जगत असतात. या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांचा दर्जा हा या अर्थाने सन्माननीय अपवाद वगळता प्रातिनिधिक आहे.
