धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या “साडी वॉकॅथॉन” या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भल्या पहाटेपासूनच तुळजाभवानी स्टेडियम परिसर महिलांनी फुलून गेला होता. दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.45 वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथे महिलांची मोठी गर्दी जमली होती. कॅन्सर जनजागृतीसाठी शहरातील विविध नामांकित महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या साडी वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
ओस्ला ओयासीस लेडीज फाउंडेशन, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, आय.एम.ए. डॉक्टर वुमन्स विंग, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ धाराशिव, निमा वुमन्स फोरम या संघटनांच्या वतीने “द रियल इस्टेट मॉल” प्रस्तुत साडी वॉकॅथॉन यशस्वीरित्या पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात तुळशीला पाणी घालून, दीपप्रज्वलन व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे व सौ. संगीता लातुरे, शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. नेहा काकडे, कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक व ओस्लाच्या संस्थापक किरण देशमाने यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये कमलताई नलावडे, डॉ. कौशाली राजगुरू, डॉ. रेखा ढगे, नीता कठारे, डॉ. दीपिका सस्ते, डॉ. अस्मिता बुरगुटे, डॉ. श्रद्धा मुळे, डॉ. दिपाली रामढवे आदी मान्यवर उपस्थित होते. सुंदर साड्या परिधान करून सहभागी झालेल्या महिलांसाठी कॅन्सर जनजागृतीसाठी पुण्याच्या प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. श्रुती गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी धाराशिवचे नाव राज्य, देश व जगभर पोहोचवणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना “धाराशिव नारी शक्ती पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये पुरातत्व संशोधक माया जगदीश पाटील, उद्योजिका पूर्वी गजेंद्रगडकर, उद्योजिका प्रतिभा देशमुख, राज्यस्तरीय बॉडी बिल्डर स्नेहा बर्डे, आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “जब्राट” चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका व लेखिका प्रगती कोळगे यांचा समावेश होता. कार्यक्रमात महिलांसाठी विशेष झुंबा सेशन आयोजित करण्यात आले होते. तसेच कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढण्यात आला. ज्यामध्ये अनेक महिलांना साड्या, सोन्या-चांदीचे दागिने व रोख बक्षिसे मिळाली.

