तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील 9 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 18 गणांची मतमोजणी सोमवार दि. 9 फेब्रुवारी रोजी होणार असून, ही मतमोजणी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया गणनिहाय केली जाणार असून यासाठी एकूण 16 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व एक शिपाई नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.


मतमोजणीचे वेळापत्रक जाहीर

मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9.30 वाजता उमेदवारांना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 10 वाजता टपाली मतदानाची मतमोजणी सुरू होईल. तर सकाळी 10.15 वाजता ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे.


दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता

निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश गणांचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून, सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Top