कळंब (प्रतिनिधी)- दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचा ताण असतानाच कळंब शहरात महावितरणाच्या स्मार्ट मीटर प्रणालीने अक्षरशः ‌‘शॉक‌’ दिला आहे. शहरातील विविध भागांत मंगळवारपासून जवळपास 200 हून अधिक घरांचा वीजपुरवठा अचानक खंडित करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विशेष म्हणजे काही बँका व शासकीय कार्यालयांचाही वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्मार्ट मीटर प्रणालीमुळे थकबाकीदार ग्राहकांची वीज ऑनलाइन पद्धतीने तत्काळ खंडित केली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात बिल भरूनही वीज तोडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ‌‘स्मार्ट‌’ प्रणाली की ‌‘त्रासदायक‌’ प्रणाली? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

परीक्षेच्या ऐन काळात वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. “माझे दहावीचे पेपर सुरू आहेत. आधीच अभ्यासाचा ताण आहे. त्यात रात्री वीज नसल्याने अभ्यास कसा करायचा?” असा सवाल एका विद्यार्थ्याने केला. तर एका बारावीच्या विद्यार्थ्याने, “शेवटचे पेपर बाकी असताना घरची वीज तोडली. निकालावर परिणाम झाला तर जबाबदार कोण?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला.

महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, थकीत बिलांमुळे ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात असल्याचे सांगण्यात आले. पूर्ण बिल भरल्यानंतर वीज तत्काळ सुरू केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र बिल भरल्यानंतरही दोन-दोन दिवस अंधारात राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.


संतप्त ग्राहकाचा आरोप

“मी 14 जानेवारीला महावितरणाकडे चेकद्वारे पैसे जमा केले होते. तरीही खात्याची पडताळणी न करता माझा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दोन दिवस कुटुंबासह अंधारात राहावे लागले. ही कोणती स्मार्ट व्यवस्था?”

 एक संतप्त ग्राहक


दरम्यान, नागरिकांनी महावितरणने मानवी दृष्टीकोन ठेवून किमान परीक्षेच्या कालावधीत वीज खंडित करू नये, तसेच बिल भरल्यानंतर तात्काळ प्रणाली अपडेट होईल याची खात्री करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात येत आहे.

स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे कळंबमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता महावितरण या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Top