धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने सचिव, राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या संदर्भीय पत्रानुसार संबंधित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या तारखेपासून संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आणि मतदान समाप्त होईपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाची जनमत चाचणी तसेच मतदानोत्तर चाचणी घेण्यास व त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या कालावधीत वर्तमानपत्रे,नियतकालिके, माहितीपत्रके,फलक किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांतून तसेच खाजगी किंवा सरकारी रेडिओ, दूरदर्शन, केबल टी.व्ही., डीटीएच, प्रादेशिक किंवा स्थानिक केबल टी.व्ही., सॅटेलाइट चॅनेल्स, एसएमएस सेवा, इंटरनेट, फेसबुक तसेच तत्सम उपलब्ध असलेल्या सर्व सोशल मिडिया माध्यमांद्वारे जनमत चाचणी व मतदानोत्तर चाचणीचे कोणतेही निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता व लोकशाही मूल्ये अबाधित राखण्यासाठी हे निर्बंध अत्यंत महत्त्वाचे असून,संबंधित सर्व विभाग,माध्यमे व व्यक्तींनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.आयोगाच्या आदेशानुसार या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही तत्काळ अनुसरण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.