धाराशिव (प्रतिनिधी)- मुलीच्या जन्माचे स्वागत करणारा आणि समाजात समतेचा संदेश देणारा ‘लेक वाचवा,लेक वाढवा,लेक घडवा’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावा,यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य शासनामार्फत ‘खबरी योजना’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी मुलीच्या जन्मासाठी लढा देणाऱ्यांना शासनाकडून बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पी.सी.पी.एन.डी.टी.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती,रुग्णालये किंवा केंद्रांविषयी विश्वासार्ह माहिती देणाऱ्या नागरिकास,या माहितीची खातरजमा करून त्या अनुषंगाने खटला दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत रुपये 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे,माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंबाची आणि समाजाची शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, कर्तृत्व आणि संस्कारांच्या माध्यमातून मुली समाजाला दिशा देतात.मात्र काही ठिकाणी अजूनही गर्भलिंग निदानासारख्या अमानवी प्रथांमुळे मुलींचा जन्म थांबवण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
गर्भलिंग निदानाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.तसेच तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 18002334475 किंवा 104 यांचा वापर करता येईल. याशिवाय अधिक माहितीसाठी amchimulgimaha.in या संकेतस्थळाला भेट देता येईल. मुलगी वाचवणे म्हणजे भविष्यातील सशक्त समाजाची पायाभरणी होय. त्यामुळे ‘लेक वाचवा,लेक वाढवा,लेक घडवा’ हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्येकाच्या कृतीतून साकार होणे आवश्यक आहे.