धाराशिव (प्रतिनिधी)- भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. केंद्रीय भूजल विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या डेटाबेसचा समन्वित व व्यापक वापर करून जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक करता येईल. गावपातळीवरील जलसुरक्षा आराखडे, पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी केले.
शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण होणाऱ्या मौल्यवान माहिती भांडाराचा स्थानिक भूजल व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अधिकाधिक प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय भूजल विभाग,पुणे यांच्या वतीने एक अभिनव व आश्वासक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय भूजल विभागाच्या भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग” या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय भूजल विभागाचा तळागाळापर्यंत सखोल परिचय व्हावा, विभागातील भूजल वैज्ञानिकांचे कार्य व त्याचे महत्त्व सर्व संबंधित विभागांना समजावे,या हेतूने आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पुजार बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ.उपेंद्र धोंडे यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,जलसंपदा विभाग,मृदा व जलसंधारण,जलसंधारण विभाग, लघु सिंचन,वन,कृषी विभाग तसेच अन्य संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आभार व्ही. हेमलता भूजल वैज्ञानिक यांनी मानले.