उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यात ऐनवेळी झालेल्या युती व आघाडीमुळे अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे. यातच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्याचे अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आलुर गट भाजपाच्या वाटणीला गेल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षात बंडखोरी झाली. तर तुरोरी गटात गेटकेन उमेदवार दिल्याने भाजपात बंडखोरी झाली आहे. गुंजोटीतही भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे.
तालुक्यातील आलुर गट हा सर्वसाधारण प्रवर्गातील सुटलेला आहे. या गटात आलुर, बेळंब, वरनाळवाडी, केसरजवळगा, कोथळी, कंटेकुर व आनंदनगर या गावांचा समावेश आहे. या गटात आलुर व केसरवळगा या गणांचा समावेश होतो. आलुर गण नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी तर केसरजवळगा गण मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय समाजासाठी राखीव असल्याने या गटातून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले या महायुतीच्या उमेदवार शिवसेनेकडून उभ्या आहेत. आलुर गटातून मागील निवडणुकीत शरण पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला व पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांना उमेदवारी दिली. दुसऱ्या बाजूला आप्पासाहेब पाटील हे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांनी जिल्हा परिषद लढवण्याची इच्छा व्यक्त करुन तयारीही केली. परंतु ऐनवेळी जागा भाजपाला सुटली आणि पंचाईत झाली. यामुळे आप्पासाहेब पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. दिवसभर राजकीय नेतेमंडळींनी आप्पासाहेब पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाच्या मदन पाटलाविरोधात त्यांचेच साडूभाऊ शिवसेनेचे आप्पासाहेब पाटील यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. तुरोरी गट हा इतर मागासवर्गीय महिलासाठी राखीव आहे. या गटात तुरोरी, मुळज, आष्टा ज., दाबका, एकोंडी ज., एकोंडीवाडी, चिंचोली ज., मळगी, मळगीवाडी आदी गावांचा समावेश आहे. येथील तुरोरी पंचायत समिती सर्वसाधारण तर मुळज पंचायत समिती सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. महायुतीत तुरोरी गट भारतीय जनता पक्षाला सुटला परंतु भाजपाने बाहेरील उमेदवार दिल्याने अर्चना युवराज जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. गुंजोटी गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. या गटात गुंजोटी, गुंजोटीवाडी, जकेकुर, जकेकुरवाडी, कोरेगाव, औराद, एकुरगा, एकुरगावाडी या गावांचा समावेश आहे. येथे गुंजोटी पंचायत समिती सर्वसाधारण महिला तर जकेकुर पंचायत समिती खुली आहे. गुंजोटी गटात भारतीय जनता पक्षाचे मल्लिकार्जुन साखरे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.