धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनाला वेदना देणारी आणि काळजाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना असून, अजितदादा आपल्यातून इतक्या लवकर निघून जातील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रभावी नेतृत्व करत होते. परखड विचार, स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणे रोखठोक मत मांडण्याची त्यांची शैली सर्वश्रुत होती. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. मात्र या कठोर बाह्य रूपामागे अतिशय निर्मळ, संवेदनशील आणि माणुसकी जपणारे मन होते. याचा अनुभव मला स्वतःला अनेक वेळा आला आहे.तळागाळातील सामान्य माणसाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. शेतकरी, कामगार, युवक, महिला यांच्यासाठी ते नेहमीच धावून जाणारे नेतृत्व होते. विकासकामे, पाणीप्रश्न, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विषयांवर त्यांचा ठाम आग्रह होता.धाराशिव जिल्ह्यावर अजितदादांचे विशेष लक्ष आणि प्रेम होते. जिल्ह्यातील विकासकामांसाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याने एक दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला आहे.अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रती संवेदना व्यक्त करत, या महान लोकनेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
