धाराशिव (प्रतिनिधी)-  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी पत्रसृष्टीतील पहिल्या अनियतकालकाच्या निमित्ताने दर्पण दिन आज 6 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांनी पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन व्यक्त केलेल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील अनेक पैलूंचा उल्लेख करून बदलती पत्रकारिता आणि त्यानुसार होत चाललेले बदल या संदर्भात माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आणि कार्यालयीन कर्मचारी नंदू पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तर यावेळी जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांनी धाराशिव जिल्ह्यात विकासाच्या प्रश्नावर पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याने पत्रकारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकार संतोष हंबीरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील विकासात्मक पत्रकारितेच्या संदर्भात काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची गरज व्यक्त केली.तर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव रवींद्र केसकर यांनी विविध कार्यक्रमाची माहिती सांगितली. 

यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रसेन देशमुख, श्रीराम क्षीरसागर, चेतन धनुरे, राजेंद्रकुमार जाधव, सुधीर पवार, प्रशांत कावरे, शितल वाघमारे,बाळासाहेब मुंदडा, कालिदास म्हेत्रे, विपिन वीर, काकासाहेब कांबळे, अजय पारवे, किशोर माळी, आकाश नरोटे, सलीम पठाण,रहीम शेख, जुबेर शेख आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते. 


काँग्रेस तर्फेही सत्कार 

पत्रकार दिनानिमित्त धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, उमेश राजेनिंबाळकर, पत्रकार संघाचे देविदास पाठक, राजाभाऊ वैद्य आदी उपस्थित होते. 

 
Top