मुरुम (प्रतिनिधी)- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. 6) रोजी मुरुम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुरुम शहर व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी मुरुम शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, पत्रकार राजेंद्र कारभारी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे आदींचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, जबाबदारी आणि बदलत्या काळातील आव्हाने यावर विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक भान जपत पत्रकारांनी कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डिजिटल युगात अफवांपासून दूर राहून तथ्याधारित पत्रकारितेची गरज अधिक वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा लेखणी व डायरी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार प्रा. अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा. नारायण सोलंकर, प्रा.अभिजीत अंबर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा. संजय गिरी तर आभार पत्रकार प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मानले

 
Top