धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय : विशेष सिकलसेल तपासणी पंधरवडा’ ही मोहीम दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये,असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना (साकोरे) बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले आहे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये,अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत.
राज्यात 1 कोटी 5 लाखांहून अधिक तपासण्या; 12,420 रुग्ण, 1,24,275 वाहक सन 2019 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यात एकूण 1 कोटी 05 लाख 86 हजार 733 सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 12,420 सिकलसेल रुग्ण आणि 1,24,275 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत.
राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन 2008 पासून आदिवासी व दुर्गम भागांत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.ठाणे, नाशिक,नंदुरबार,अमरावती,गोंदिया, गडचिरोली,पालघर,नागपूर,वर्धा,चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ,धुळे,जळगाव,बुलढाणा, नांदेड,वाशिम,अकोला,छत्रपती संभाजीनगर,रायगड व हिंगोली या 21 जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत जनजागृती,मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एचपीएलसी तपासणी,मोफत औषधे, समुपदेशन,नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा देण्यात येतात.
सिकलसेल आजार म्हणजे काय
सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून आई-वडिलांकडून अपत्यांना होतो.हा लाल रक्तपेशींशी संबंधित आजार आहे.सामान्य रक्तपेशी वर्तुळाकार व लवचिक असतात,तर सिकलसेल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात.त्या रक्तवाहिन्यांना चिकटून राहतात, त्यामुळे रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच सिकलसेल क्रायसिस म्हणतात. त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि वारंवार इजा झाल्याने अवयव निकामी होऊ शकतात.प्लीहा सुजते,रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग वाढतो.हाडे,फुफ्फुसे, यकृत,प्लीहा,मेंदू तसेच डोळे,स्वादुपिंड, त्वचा यांवर परिणाम होऊ शकतो.
प्रतिबंधासाठी काय करावे
विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करावी. लाल () व पिवळे () गुणधर्म असलेल्यांनी परस्पर विवाह टाळावा. सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्यांच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी. सिकलसेलची लक्षणे : हिमोग्लोबिन कमी होणे,हातपाय सूजणे,भूक मंदावणे,सांधे दुखणे,तीव्र वेदना,लवकर थकवा,चेहरा निस्तेज दिसणे.
उपचार काय
सिकलसेलचा पूर्ण उपचार नाही; मात्र योग्य औषधोपचार,नियमित तपासणी,फॉलिक ॲसिड व इतर औषधे,भरपूर पाणी, वेदनाशामक औषधे,समतोल आहार,गरज असल्यास रक्त संक्रमण,तसेच काही प्रकरणांत बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशनद्वारे पूर्ण बरे होण्याची शक्यता असते.अर्थसहाय्य व सवलती सिकलसेलग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते.10 वी व 12 वीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रत्येक तासाला 20 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जातो.बस प्रवासात सवलत मिळते. राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.