धाराशिव (प्रतिनिधी)- 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस.लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील सभागृहात आज उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजन जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनी लोकशाहीची मूल्ये जपण्याची,संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा जबाबदारीने वापर करण्याची आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची सामूहिक मतदार शपथ घेतली.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी देखील अभिवादन करून पुष्प वाहिली. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये मतदार म्हणून असलेल्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा आहे. मतदार नोंदणी करणे,मतदान करणे व स्वच्छ,पारदर्शक आणि निर्भय निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीच्या सुदृढतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मताचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे नमूद करण्यात आले. मतदान हे केवळ अधिकार नसून एक सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांनी ठेवावी,असे आवाहन करण्यात आले.विशेषतः युवकांनी मतदार नोंदणी करून पहिल्यांदाच मतदान करताना उत्साहाने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये जागरूकता वाढविणे, मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या उपक्रमामुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढाकणे,नायब तहसीलदार सचिन पाटील,संतोष पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
