धाराशिव (प्रतिनिधी)- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत व्हिजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता अशा विविध योजनांसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अर्ज तात्काळ भरून महाडीबिटी प्रणालीवर सादर करावे. हे अर्ज http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावरून 31 जानेवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. 

सन 2025-26 करिता बहुतांश विद्यार्थ्यांनी महाडीबिटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरले असून, ते अर्ज सध्या महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून अद्यापपर्यंत या अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले नाहीत.

तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेले व्हीजेएनटी,ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पात्र शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ मंजुरीसाठी या कार्यालयाकडे सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करताना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक ही कागदपत्रे मूळ स्वरूपात असावीत, याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या अर्जांमध्ये त्रुटी असतील, ते अर्ज त्रुटीपूर्तता करूनच मंजुरीसाठी सादर करावेत.

याशिवाय,ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरून तात्काळ सूचना देण्यात याव्यात. तथापि, सद्यस्थितीत जिल्ह्यात सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 1 हजार 234 अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले सर्व अर्ज 31 जानेवारी 2026 अखेर निकाली काढणे बंधनकारक असून, आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी. तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात महाडीबिटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी नोंदणीकृत विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास,त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याची राहील. असे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव यांनी कळविले आहे.

 
Top