धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी मुख्य न्याय दंडाधिकारी मे. नावंधर मॅडम यांनी सबळ पुराव्या अभावी 5 आरोपींची ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून निर्दोष मुक्तता केली.
गुन्ह्याची थोडक्यात हाकिकत अशी की दिनांक 11. 6. 2012 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किसन देविदास जाधव राहणार भातंब्रा तांडा, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांना कामासाठी गावाकडून जाधववाडी शिवारात जुनोनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ एसटीतून उतरता क्षणी दयानंद चव्हाण, राजेंद्र चव्हाण, रेखाबाई चव्हाण, संदीप राठोड, कमल राठोड या सर्वांनी मिळून ऊस तोडीचे मागील झालेल्या किरकोळ भांडणावरून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. व दयानंद चव्हाण यांनी त्याच्या हातातील काठीने किसन जाधव यांच्या डाव्या हातावर मारून डावा हात फॅक्चर केला अशा आशयाचा जवाब फिर्यादी किसन जाधव हे दवाखान्यात ऍडमिट असताना पोलिसाकडे दिल्याने या सर्व आरोपी विरुद्ध उस्मानाबाद येथे गुन्हा कलम 325, 147, 148, भादवीप्रमाणे दाखल होऊन पुढील तपास बिट अंमलदार कुरेशी यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी तपास करून सर्व आरोपी विरुद्ध उस्मानाबाद येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरील प्रकरण हे खूप वर्षापासून न्यायालयामध्ये साक्षी पुराव्यासाठी पेंडिंग होते. झालेल्या साक्षी पुराव्यामधून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध न झाल्याने पाचही आरोपीचे वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान न्यायाधीश नावंदर मॅडम यांनी आज रोजी सर्व आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करून हे प्रकरण निकाली काढले. सदर प्रकरणांमध्ये आरोपीच्या वतीने ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. आनंद पाटील, ॲड. धनंजय मडके, ॲड. चैतन्य वीर यांनी सहकार्य केले.