धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक अपघातात निधनामुळे एक भावनिक पत्र सोशल मिडियावर टाकले आहे.
प्रताप सरनाईक हे पुर्वी युवक कॉग्रेसमध्ये होते. अजित पवार त्यावेळेस पहिल्या फळीतील नेते होते. त्यामुळे सरनाईक यांनी अजित पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रिय अजितदादा, आज हे पत्र लिहिताना, वेळ थांबलेली वाटते, परंतु आठवणी कायम असणार, मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाहीत. गेली 30 35 वर्षे तुमच्यासोबतचा प्रवास माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. विद्यार्थी संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा तुमच्यासमोर आलो, तेव्हा मी युवक काँग्रेस, ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली होती.
दादा,बारामतीला आलो की तुमच्यासोबतच्या भेटीगाठी फक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या. काम कसं करावं, स्वच्छता कशी ठेवावी, आणि माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं मी तुमच्याकडून शिकलो. तुमचं प्रेम मनापासून असायचं. “प्रतापला मदत करायचीय,”असं तुम्ही हसत म्हणायचात, आणि मी मागे वळून पाहिलं की तुमचं भक्कम पाठबळ कायम माझ्या पाठीशी उभं असायचं. तुमची मुलं मित्र आहेतच परंतु पवार कुटूंबाशी देखील अत्यंत जवळचे संबंध देखील आहेत. कारण नाती कशी जपायची हे तुम्ही केवळ सांगितलं नाही, तर जगून दाखवलंत.
जुलै 2008 मधला सिद्धिविनायक मंदिरातील तो दिवस, रत्नजडीत मोबाईलचा तो प्रसंग तो मोबाईल नव्हता दादा, तो माझ्या मनातलं तुमच्यावर असलेलं प्रेम होतं. आजही लोक त्या घटनेमुळे मला ओळखतात, आणि त्यामागे तुमचंच नाव आहे. कालचं कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर मी तुम्हाला 9 तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज तुम्ही नाहीत हे अजूनही खरं वाटत नाही. आमच्या नात्यात कधी कोणी आड आलं नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मला आपलंसं केलंत. तो विश्वास, ते प्रेम मी आयुष्यभर जपेन.
दादा, तुमचं जाणं म्हणजे फक्त एका मोठ्या नेत्याचं नाही, तर माझ्या आयुष्यातील एका मार्गदर्शकाचं, एका आपुलकीच्या माणसाचं जाणं आहे. तुमच्या आठवणी, शिकवण आणि दिलेला विश्वास माझ्या प्रत्येक पावलात कायम सोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. दादा तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही. शेवटी प्रताप सरनाईक यांनी आपलाच प्रताप सरनाईक असा उल्लेख केला आहे.
