तेर (प्रतिनिधी)- थोडसरवाडी ता.धाराशिव येथील दिपाली काकासाहेब थोडसरे यांना सन 2026 चा कै. डॉ. चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या धाराशिव येथील मंजिरी सखी शेतकरी उत्पादक कंपनी एफपीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, महिला सक्षमीकरण, शाश्वत व सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय तसेच सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय योगदान देत आहेत.
मंजिरी सखी एफपीसी मार्फत त्या सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, उद्योजकता विकास व बाजारपेठ संधी निर्माण यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत. त्याच प्रमाणे नवीन तयार झालेल्या महिला एफपीसी ना बेसिक ते व्यवसाय डेव्हलप करण्यासाठीचे प्रशिक्षण देणे. त्यांच्या या प्रभावी कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ही श्रावणी महिला पतसंस्था यांच्याकडून आदर्श महीला पुरस्कार, टाटा ट्रस्ट (मुंबई) चा सन्मानपत्र महिला उद्योजिका पुरस्कार, उद्यामी पुरस्कार, विजयालक्ष्मी दास इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय योगदानामुळेच त्यांना कै. डॉ. चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला असून, विशेष समारंभात सन्मानचिन्ह, मानपत्र व अकराशे रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक नरहरी बडवे यांनी दिली.
