धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांची सासरवाडी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या मृत्यूचा सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असून धाराशिव जिल्ह्याच्या वातावरणात देखील दुःखाची छाया पसरली आहे. अजित दादांची सासुरवाडी असणाऱ्या तेर गावामध्ये सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले असून, आज दुकानेही बंद आहेत. तेरमधील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून, सामान्य नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
अजितदादा पवार हे धाराशिव जिल्ह्यातील पाटील घराण्याचे जावई होते. आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विवाह सोहळ्याला अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी उपस्थिती लावत घरच्या सोहळ्याप्रमाणे ते या लग्नाच्या सोहळ्यात रमले होते. अजितदादा यांच्या दुर्दैव मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला असून , अर्चनाताई पाटील आणि चिरंजीव मल्हार पाटील व मेघ पाटील यांनी समाज माध्यमावर पूर्ण ब्लँक असणारे स्टेटस ठेवले असून भावना व्यक्त करण्यास शब्द नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धाराशिव शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अजित दादा पवार यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांची सासुरवाडी असणाऱ्या तेर या गावी गावकऱ्यांच्या वतीने जुन्या बसस्थानकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा पवार यांच्याशी अजित पवार यांचा विवाह झाला होता. आमदार राणा पाटील यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी वैयक्तिक पातळीवर पाटील परिवाराने आणि पवार परिवाराने एकमेकांशी कौटुंबिक स्नेह कायम ठेवला होता.
आमदार राणा पाटील यांचे अजित दादांसोबत विशेष नाते होते. हाच स्नेह पुढील पिढीने देखील जपला असून, आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि मेघा पाटील यांनीही पुढे अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतचे कनिष्ठ कौटुंबिक संबंध जपले आहेत. अजितदादा यांच्या निधनाचे दुःख ज्याप्रमाणे पवार कुटुंबाला आहेत तसेच दुःख पाटील कुटुंबीयांना देखील झाले आहे.
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनीही अजितदादा पवार यांच्या निधनावर समाज माध्यमातून दुःख व्यक्त केले असून आज महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून अजितदादा यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

