परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णयक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन हे धक्कादायक अन् अविश्वसनीय आहे. त्यांच्या अशा अपघाती निधनाने महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी स्व.अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर पुढे म्हणाले की, अजितदादा स्पष्ट वक्ता, पोटात एक अन् ओठात एक असे न ठेवता, जे आहे ते स्पष्ट व परखडपणे बोलणारे होते. प्रशासनावर मजबूत पकड असणारे आणि शब्दाचा पक्का अशी त्यांची ओळख होती. भल्या पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करणारे ते राजकारणी होते. माणसात मिळणारे सामान्य माणसातले असामान्य ते नेता होते. नेहमी कार्यक्रमास अगदी वेळेत पोहचणा-या शिस्तप्रिय असलेल्या अजितदादांनी आज मात्र वेळ चुकवली ती कायमचीच. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भावूक होऊन अजितदादा हे दिलखुलास व दिलदार व्यक्तिमत्व होते. पक्षा पलीकडे जाऊन त्यांनी विधानपरिषदेत आपल्या भाषणात माझ्याबद्दल व माझ्या कार्य प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख करून कौतुक केले होते, असे म्हटले. अजितदादा सप्टेंबर मध्ये झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे महापुरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी परंडा तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या समवेत भोजन करतानात् यांच्याशी मोकळेपणाने अनेक विषयावर चर्चा झाली. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोणीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतो, पण शासन दप्तरी कुठेही ‘ओला दुष्काळ’ अशी नोंद अथवा उल्लेख नाही. पण आपण निश्चित झालेले नुकसान पाहता अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करू आणि ती महायुती शासनाने केलीही.
धाराशिव जिल्ह्याचे जावई म्हणूनही जिल्ह्याशी त्यांचे वेगळे नाते होते. अर्थ, सहकार, शिक्षण, शेती, सिंचन या विषयांवर त्यांचा अभ्यास व कार्य आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून येणाऱ्या पिढ्यांना ते कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व हरपले असून अजितदादांच्या या अकाली अपघाती निधनामुळे महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.असेही ठाकूर म्हणाले.
