भूम (प्रतिनिधी)- सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करताना “शेतकऱ्यांचा दोष नाही, शासन मदत देणारच,” असे ठाम आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूम तालुक्यात दौरा करताना दिले होते. यावेळी त्यांनी तहसीलदार जयवंत पाटील यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत, नुकसानभरपाईत कोणालाही वगळले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.“रेकॉर्ड जितक्या लवकर येतील तितक्या लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातील,” हा त्यांचा शब्द शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला होता.
बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या एका चार्टर्ड विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे आकस्मिक निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या दुःखद घटनेचे वृत्त कळताच भूम शहरात सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना व नागरिकांच्या वतीने पूर्ण दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच बाजारपेठा बंद, रस्त्यांवर शुकशुकाट आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव दिसून आले.
गोलाई चौकात शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत रुपेश शेंडगे, विठ्ठल बागडे, अनिल शेडगे, रमेश मस्कर, विनोद नाईकवाडी, गाढवे महाराज, बाळासाहेब काका पाटील, शंकर नागरगोजे, हनुमंत पाटोळे, असिफ जमादार, संजय पाटील, नवनाथ रोकडे, गणेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. भूम शहरातील प्रत्येक चौकात, प्रत्येक घरात एकच भावना व्यक्त होत होती.“महाराष्ट्राने आपला कणखर आवाज गमावला.”
