धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय योगासन स्पोर्ट्स महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र योगासन स्पोर्ट संघटनेच्या वतीने संगमनेर येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत धाराशिवच्या सतीश साबळे यांनी सुवर्ण तर हिंदवी चौरे हिला 2 रौप्य पदक पटकाविले आहे. साबळे यांची जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
दिल्ली येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारे धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स संघटनेचे योगपटू सतीश साबळे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सिनीयर गटातून सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड होणारे ते जिल्ह्यातील पहिले योगपटू ठरले आहेत. तसेच सब ज्युनिअर गटातून हिंदवी चौरे हिने 2 रौप्य पदक पटकावत खेलो इंडिया योगासन स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. सतीश साबळे आणि हिंदवी चौरे यांची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या कामगिरीबद्दल धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष अतुल अजमेरा, उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव स्वाती गडदे, सहसचिव राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर कार्यकारीनी सदस्य रामकृष्ण खडके, रामेश्वर सावंत, प्रणाली जगदाळे, इंदुमती जाधव, सीमा चौरे आदींसह जिल्ह्यातील योग प्रेमी योगपटू यांनी अभिनंदन केले आहे.
