धाराशिव (प्रतिनिधी)- धनगर समाजाची गौरवशाली परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पहाडी आवाजातून आणि ढोलाच्या गजरात जनमानसात रुजवणारे लोकशाहीर बिरुदेव एडके यांना ‌’हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्काराने सपत्नीक सन्मानित आले. 

सांगली येथील हालमत संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये लोकशाहीर एडके, पत्नी शामल एडके यांना डॉ. सुषमा पुजारी, सोनाली उद्योग सुमहाचे संदीप कारंडे, सिध्दाप्पा गावडे, वारणा दुध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, कोल्हापुरी फेटा, घोंगडी आणि श्रीफळ असे आहे. धनगर संस्कृतीत घोंगडी आणि फेटा यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे हा सन्मान एडके यांच्यासाठी भावनिक ठरला. ‌’हालमत‌’ संस्कृतीतील ओव्या, गीते आणि लोककथा जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.  हालमत संस्कृती संवर्धन संस्था ही गेल्या नऊ वर्षांपासून धनगर समाजाच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या आणि कलेचे जतन करणाऱ्या कलावंतांचा सन्मान करत आहे.  हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून त्यांनी जपलेल्या लोककलेचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. यावेळी एडके यांचे कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय बळीराम क्षिरसागर, पांडुरंग घोडके प्रामुख्याने उपस्थित होते. पांडुरंग घोडके यांनी एडके यांच्या कलाप्रवासात दिलेल्या योगदानाबद्दलही यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आजच्या आधुनिक युगात आपली मूळ संस्कृती हरवत चालली आहे. अशा काळात बिरुदेव एडके यांच्यासारखे लोकशाहीर ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवत आहेत. त्यांना हा पुरस्कार देताना संस्थेला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार शाहिर सागर माने यांनी काढले. तर बिरुदेव एडके म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे माझ्या कलेला मिळालेली पावती आहे. माझ्या कुलदैवताची ओवी गायण हा संस्कृतीचा कणा असून तो सन्मान मला मिळाल्यामुळे माझी जबाबदारी आता अधिक वाढली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या संस्कृतीचा अणि कुलदैवतांचा प्रसार आणि ओवी गायण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल एडके यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    

 
Top