धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.जिल्ह्यात या निवडणुकीदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही,याची दक्षता घ्यावी.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना पुजार बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, संतोष राऊत, अरुणा गायकवाड, श्रीकांत पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, दत्तू शेवाळे, गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, अनिल चोरमले, सुरेश राऊत, अरविंद शेलार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ यांची सभागृहात तर सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
पुजार म्हणाले की, अनधिकृत बॅनर व जाहिरात फलक काढण्यात यावे. शहरी भागात बॅनर लावण्यात येत असतील तर त्याची पूर्व परवानगी नगरपरिषदेकडून घेण्यात यावी. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. खोखर म्हणाल्या की,निवडणूक काळात पोलिसांकडे असलेल्या जबाबदारीची माहिती त्यांना आहे. उमेदवार व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या प्रचारार्थ देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या निःपक्षपातीपणे देण्यात याव्या. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असलेल्या विविध कलमांची तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली व काही सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.