धाराशिव (प्रतिनिधी)- संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी पोलिस कवायत मैदानावर शहरातील विविध शाळांच्या 3000 विद्यार्थ्यांनी देशभक्तीवरील गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. तर यावेळी परेडमध्ये पोलीस पुरुष- महिला, गृह रक्षक दल, एनसीसी, पोलीस बँड पथक, तुळजापूर सैनिक स्कूलचे विविध शाळांचे एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडचे पथक यांनी मानवंदना दिली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. या सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस कवायत मैदानावर 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, भास्करराव नायगावकर, नामदेव माने, श्रीपती जावळे, बाबुराव तवले, शेषराव बनसोडे, कलावती उंबरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे. प्रारंभी पालकमंत्री सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, संतोष राऊत, प्रवीण धरमकर, स्वाती शेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी सचिन इगे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, नागरिक, पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हनुमंत पडवळ यांनी केले.