धाराशिव (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील कर्मचारी विलास मनोहर फुटाणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
फुटाणे यांनी रुग्णालयातील प्रशासकीय तसेच दैनंदिन कामकाजात प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता व कार्यक्षमतेने जबाबदारी पार पाडत रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना अधिष्ठाता डॉ. शैलंद्र चौहान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शैलंद्र चौहान हे होते. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ, प्राध्यापक तथा उप अधिष्ठाता डॉ. शफीक मुंढेवाडी, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्मिता गवळी, अधिसेविका श्रीमती. सुमित्रा गोरे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशस्तीपत्र स्वीकारताना फुटाणे यांनी हा सन्मान सर्व सहकारी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्याची भावना व्यक्त केली व रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती गडेवार व कु. समृध्दी चौथाईवाले तर आभारप्रदर्शन कु. साक्षी दाभाजे यांनी व्यक्त केले.
