वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025-26 चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दिनांक 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे उत्साहात पार पडल्या.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत वाशी तालुक्यातील पारा केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भालेकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपले कौशल्य सिद्ध केले, तर गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून वाशी तालुक्याचा नावलौकिक वाढविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच वाशी तालुक्याचे गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांच्या हस्ते भालेकर यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सिद्धेश्वर भालेकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे वाशी तालुक्याच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्राचा गौरव अधिकच वाढला आहे.
