धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणच्या वतीने आज शुक्रवारी दि.2 जानेवारी रोजी उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारी असलेल्या सौरकृषीपंपधारक वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

धाराशिव विभागांतर्गत येणाऱ्या धाराशिव विभागातील तेर, परंडा या उपविभागात शुक्रवारी दि.2 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या लोहारा, उमरगा, नळदुर्ग व तूळजापूर या उपविभागांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. या तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.


 
Top