धाराशिव (प्रतिनिधी)- ऐन झेडपी निवडणुकीच्या काळात तालुक्यातील अंबेजवळगे व येडशी गटात उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांच्या प्रयत्नाने दोन्ही गटातील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही गट आणि गणातील महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे.
अंबेजवळगे येथील जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन तथा अंबेजवळगे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ राऊत, माजी उपसरपंच लक्ष्मण जाधव, शिवसेना उबाठा पक्षाचे अविनाश (बंडू) यादव, ज्ञानेश्वर जाधव यांनी जि.प. निवडणुकीतील अंबेजवळगे गटातील भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. रोहिणीताई श्याम जाधव तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार भाऊसाहेब धंगेकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शाम जाधव, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच आनंद कुलकर्णी, अनिल शिंदे, सत्यवान चांदणे, मोहन साबळे, मनोज रणखांब, अतुल देशमुख, सद्दाम शेख, संदीप शिंगाडे, बालाजी जाधव, नितीन कोळेकर, अमोल माळी, अमोल हाजगुडे आदीसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर येडशी गटातही विरोधकांना हादरा बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदिवासी पारधी विभागाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार यांच्यासह कसबे तडवळे, गोपाळवाडी व परिसरातील आदिवासी पारधी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये गोपाळवाडीच्या उपसरपंच सौ. ताई पिटू काळे, माजी उपसरपंच लालासाहेब पवार, आदिवासी पारधी महासंघाचे पदाधिकारी आबासाहेब पवार, दिलीप काळे, तसेच कसबे तडवळे येथील पोपट पवार, राजेंद्र काळे यांच्यासह अनेक समाजबांधवांचा समावेश आहे. यावेळी येडशी जि.प. गटातील महायुतीचे उमेदवार संजय (काका) लोखंडे, कसबे तडवळे पंचायत समितीचे उमेदवार जगन्नाथ (तात्या) विभुते, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, नाना वाघ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
