धाराशिव (प्रतिनिधी)-  कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला यावे यासाठी घेतलेले परिश्रम आता वास्तवात येत आहेत. आपल्या महायुती सरकारने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आरखड्यासाठी 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 555 कोटी 80 लाख रुपयांच्या प्रमुख चार पहिल्या कामांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेले हा निर्णय म्हणजे आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले महत्वपूर्ण पाऊल असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

चौडी येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीत 1300 कोटींचा आराखडा तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. अंतिम अहवालात हा आराखडा 1865 कोटी इतका मंजूर करण्यात आला. त्याअंतर्गत 555 कोटी 80 लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली असून या कामांची निविदा प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. मान्यता देण्यात आलेल्या कामात प्राधान्याने घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र आणि बहुउद्देशीय वाहनतळ उभारणी यासाठी 77.02 कोटी रुपये, हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह तसेच वाहनतळ उभारण्यासाठी 376.33 कोटी रुपये, आराधवाडी पार्किंग याठिकाणी सुविधा केंद्रासाठी 45.43 कोटी रुपये आणि शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी 57.23 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


108 फुट उंचीची शिवभवानी शिल्प उभारणार

यापूर्वीच हडको भागातील शासकीय भूसंपादन करण्यासाठी 28 कोटी 88 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असतानाच्या भव्य अशा 108 फूट उंचीच्या शिवभवानी शिल्पाचा समावेश असणार आहे. तसेच रामदरा तलावाच्या परिसरात भव्य उद्यानासह, साऊंड अँड लाईट शो तसेच मोठ्या प्रमाणात तलावलगत वॉटरफ्रंटची कामे साकारली जाणार आहेत. दर 15 दिवसांनी विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. मार्च 2028 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. 


भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा

तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेवूनच संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रचलित दराच्या कैकपटीने मावेजा देवून विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 
Top