धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील हे कानेगाव (ता. लोहारा) जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. पक्षश्रेष्ठी त्यांना संधी देणार का, याकडे समर्थकांसह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आनंद पाटील यांनी युवासेनेचे संघटन मजबूत करत जिल्हाभरात दांडगा संपर्क निर्माण केला असून, तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे ते पालकमंत्र्यांचेही विश्वासू म्हणून ओळखले जातात. युवासेनेची मजबूत फळी उभी करण्यामध्ये त्यांनी केलेले कार्य, तसेच तरुण, तडफदार व आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख लक्षात घेता पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व तरुणांकडून होत आहे. मित्रपरिवार आणि समर्थकांमध्येही उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
